Friday 28 September 2018

सखे,वाट तुझ्या 'अस्मितेची'.... -

Concept of Grace Womanathon

'ती' ...
संसार तोलून धरणारी अदृश्य छडी.
घरातल्या प्रत्येकाला जोडणारी प्रेमाची कडी.
घरामधल्या सजीव -निर्जीव अणूरेणूंमध्ये चैतन्य तेवत ठेवणारी 'स्वामिनी'.
संसाराची लय सांभाळत पदन्यास साकारणारी होते ती 'रमणी'
पण साऱ्या आघाड्यांवर लढतानाची तिची तारांबळ पाहताना कधी कधी वाटत त्या 'गिरीधराला' काठीचा टेकू देण्याचा भावनिक आधार देणारे सवंगडी तरी होते. पण हिचा प्रवास मात्र एकटीचा.कौटुंबिक आधार असतोच, नाही असे नाही पण काही लढाया तिच्या तिच्याच असतात.तिथे तिलाच लढावे लागते.त्या न कोणाला सांगता येतात न कोणाला तिच्यासाठी लढता येतात.
लहानपणापासून आई, आजी , काकू, मावशी, आत्या,लग्न झालेली ताई साऱ्याच नात्यात पाहत आलो आहोत तिला.
प्रेमाने साऱ्याच गोष्टी पार पाडण्याचे 'कसब' हस्तांतर करत आलीये ती, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.पण आजकाल दिवसाच्या 24 तासात, त्यातल्या वेळखाऊ गोष्टींसकट चपखल बसवण्याची अजबच कसरत तिला करावी लागतेय. ट्रॅफिक जॅम, बाहेरच्या जगात मुलांना सोडताना अनिश्चिततेच्या भीतीचे सावट, घर, मुलांचे अभ्यास, सामाजिक बांधिलकी आणि त्याबरोबर काही जणींना नोकरी सांभाळत पळत राहण्याची कसरत... आणि मग या सर्वात ती स्वतःला 'दुर्लक्षित' करते. स्वतःच्या कुठल्याच priority list मध्ये ती स्वतःच नसते.
अर्थात , सारे सुरळीत झाल्यावर देणारच असते ती लक्ष स्वतःकडे... पण हा 'उद्या' उगवल्याचा कोणीतरी पाहिलाय का?
तिच्या मनातले स्वतः विषयीचे किती तरी plans असेच धूळ खात मनात पडत राहतात.
रोजच्या पळापळीच्या खेळात  ती 'मरगळ' तिच्या शरीरावर इथे तिथे साठत राहते. प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार कोणी नकळत 'बरणी' होते तर कोणी अशक्त 'छडीची काठी'.
आजकाल ९०% बायका लग्नानंतर संसार सांभाळण्याची जबाबदारी निभावताना आपसूक या २ categories मध्ये पडताहेत.
आधुनिक सुविधांनी तिची रोजची कामे सोपी केलीयेत पण रोजचे जगणेच इतके धावपळीचे झालेले आहे की रोज रात्री पाठ टेकताना तिची आजची किमान 3 कामे पूर्ण झालेली नसतातच आणि 2  कामे नव्याने add झालेली असतात आणि हे सगळं तिला उद्याच्या कोड्यात perfect बसवायचे असते.
या सर्वात दिवस पुढे सरकत राहतात आणि 'उद्यापासून करू' चे कितीतरी plans मनातल्या मनात विरुनही जातात.
मग कधीतरी अवचित जुन्या ओळखीचे कोणीतरी भेटते. जाता जाता सहज म्हणून जाते 'किती काम करतेस जरा स्वतः कडे लक्ष दे. पार रया गेलीये बघ तुझी'.
स्वप्नातून जागी झाल्यासारखी मग ती स्वतःला न्याहाळू लागते. नकारात्मक का होईना कधीतरी, कोणीतरी आपल्या कष्टाची 'दखल' घेतली म्हणून भरून येते तिला.
तर कधी स्वतःच्या चालूच न झालेल्या plans विषयीचा संतापही येतो तिला.
मग  तिरिमिरीने पुन्हा plans होतात आणि कदाचित  एखाद -दुसऱ्या आठवड्याच्या execution नंतर परत सर्वांची धुळमाती.
हे वर्तुळ पाहताना नकळत  चातुर्मासातली आजीबाईची , सोमवारची गोष्ट आठवते आहे. सगळ्या गावाने दूध वाहिले तरी शंकरबाप्पाचा गाभारा काही भरत नाही. दिवसा अखेरी आपल्या मुलाबाळांचे यथेच्छ पोट भरून, घराचे सर्व आवरून सावरून आजीबाई देवळात येते. शिल्लक राहिलेले , छोटा तांब्या भरून दूध शंकराला वाहते आणि क्षणार्धात गाभारा सांगोपांग दुधाने भरून जातो. सख्यांनो, आपल्या मनाचे काहीसे असेच नाहीये का? त्याला अव्हेरून सर्व करायला जातो आणि मग रोजचे routine bore व्हायला लागते. अश्या 'मन' सोबत नसताना केलेल्या गोष्टी मग फक्त पार पडत राहतात. बागुलबुवा वाटायला लागतो मग घड्याळाच्या काट्यांचा.
रिते रिते राहते 'मन' खूप सारे करूनही आणि मग सारे जाऊन साठते शरीरात इथे तिथे.
जगभरात कुठल्याही देशात, रोजच्या राहाटगाडग्यात 'स्वतःसाठी न देता येणारा वेळ' ही सर्वच सख्यांची सार्वत्रिक - सामाईक समस्या आहे. तिला उत्तर मिळून शोधायचे आहे.

म्हणूनच

तिने तिच्या मनाचा गाभारा 'स्व' जाणिवेने भरायला हवा.
रोज मन मोहरून येईल असा भरभरून मोकळा श्वास तिने घ्यायला हवा.
रोज स्वतः साठीचा किमान अर्धा स्वतःच्या आरोग्यासाठी , स्वतःबरोबर च्या संवादासाठी द्यायला हवा.
आणि हे तिच करू शकते स्वतःसाठी, दुसऱ्या कोणीही करण्यापेक्षा.

टाकावे तिने जरा उंबरठ्याबाहेर पाऊल, स्वतःच्या आनंदासाठी,
चालावीत तिची पाऊलं निरालस स्वानंदासाठी,
कुठे तिच्यासाठी प्राजक्त, बकुळ फुलांचे गालिचे असतील अंथरलेले,
तर कुठे अवचित स्वप्नफुलांची सर वाहील तिच्या ओंजळी मध्ये,
प्राणवायूंच्या देवाण-घेवणीत, जाणिवा-नेणिवांच्या पल्याड घडत असते बरेच काही,
जादुभरल्या हातांनी काळजी लेकीची घेत असते धरणी माई,
कधी मुक्त वाऱ्याच्या स्पर्शणाऱ्या झुळुका, सोडवतील मनातल्या निरगाठी,
चालावीत तुझी पाऊलं कधी स्वछंदी पाऊलवाटी,
धर्मबिंदूंचे उत्सर्ग करतील वाहती तुझ्यातली सकारात्मकता,
रोजच्या routine ची 'मरगळ' कात टाकेल बघता बघता,
वितळतील मनातले काही संभ्रम पाऊले लयीत चालताना,
येईल ओठी मनात रेंगाळलेली एखादी कविता, कुंजरव ऐकताना,
विझून विरलेल्या स्वप्नांना फुटतील मग आशेचे नवे पंख,
मनमोकळा श्वास घेताना, अलवार  खुलून येईल तुझे अंतरंग,
तुझ्या स्वतःशी नव्याने होणाऱ्या या भेटीसाठी,
तुझ्या मनातल्या त्या सुंदर गावासाठी,
चल सखे चालू संगे,
वाट तुझ्या 'स्व' जाणिवेची,
वाट सकारात्मक पावलांची,
वाट तुझ्या 'अस्मितेची'.

हो! आपण सर्व मिळून चालणार आहोत आपली MARATHON
प्रत्येकीने रोजचा किमान अर्धा तास स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काढावा आणि एकमेकींच्या साथीने तो आपण नक्की काढुयात या साठी हा उपक्रम आपण हाती घेतो आहोत.अंतिम marathon दिवसापेक्षाही खूप महत्वाचे आहे या निमित्ताने काहीतरी रोजचे स्वतःविषयीचे routine मध्ये येणे. म्हणूनच आजच नोंदणी करा आणि सामील व्हा या मैत्री-साखळीत!!!